(तेजस घोसाळे, प्रतिनिधी)
अकोले तालुक्यातील भंडारदरा येथील निसर्गरम्य परिसरात शनिवार दिनांक २८ फेब्रुवारी २०२६ रोजी धम्म यात्रा व माजी मंत्री कालकथित दादासाहेब रुपवते यांच्या १०१ व्या जयंतीनिमित्त भव्य कार्यक्रम उत्साहात पार पडला.
दादासाहेब रुपवते यांनी हयातीत असतानाच भंडारदरा येथे बुद्ध विहारासाठी जागा उपलब्ध करून दिली होती. लोकवर्गणीतून उभारण्यात आलेल्या या भव्य बुद्ध विहाराचे भूमिपूजन पूज्य भंते चंद्रमणी यांच्या हस्ते झाले होते, तर उद्घाटन जागतिक बौद्ध धर्मगुरू दलाई लामा यांच्या हस्ते करण्यात आले होते. तेव्हापासून ही धम्म यात्रा अविरत सुरू असून आंबेडकरी व धम्म चळवळीचे प्रेरणास्थान ठरली आहे.
सकाळच्या सत्रात महिला पथकाच्या पारंपरिक वाद्यांच्या गजरात तथागत गौतम बुद्ध व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांची भव्य मिरवणूक काढण्यात आली. धम्म यात्रा समितीचे अध्यक्ष आयु. पोपटराव सोनवणे यांच्या हस्ते पंचशील ध्वजारोहण करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. त्यानंतर पुणे येथील पूज्य भदंत नागघोष यांनी उपस्थितांना धम्मदेसना दिली.
दुपारच्या सत्रात ॲड. संघराज रुपवते यांच्या अध्यक्षतेखाली धम्मसभा पार पडली. सामाजिक कार्यात उल्लेखनीय योगदान दिल्याबद्दल आयु. बाबुराव निकाळे, सुरेश रोकडे, आर. बी. अभंग सर व बन्सी त्रिभुवन यांना जीवन गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
यावेळी ज्येष्ठ साहित्यिक रावसाहेब कसबे, वंचित बहुजन आघाडीच्या प्रवक्त्या उत्कर्षाताई रुपवते, डॉ. आनंद देवडेकर, डॉ. अजित नवले यांची प्रमुख भाषणे झाली. तसेच अकोले तालुक्याचे आमदार डॉ. किरण लहामटे, ज्येष्ठ आंबेडकरी नेते विजयराव वाकचौरे, सुरेशराव देठे, माणिकराव यादव, सुशीलाताई रुपवते, एम. डी. सोनवणे, विनयजी सावंत, वैभव मोकळ, के. जी. भालेराव, राजू गवांदे, रमेश शिरकांडे, राजेंद्र घायवट, अरुण रुपवते, कुसुमताई माघाडे, अनुराधा आहेर, हौसाबाई जगधने, रघुनाथ भालेराव, संतोष पवार, वंदन घोसाळे, के. एस. गायकवाड, सुनिल टपाल, महेंद्र पवार, डॉ. सुधाकर शिंदे, प्रवीण गवांदे, आशिष रोकडे आदी मान्यवर उपस्थित होते.
अहिल्यानगर, पुणे, संभाजीनगर, नाशिक, ठाणे, मुंबई व नवी मुंबई येथून हजारो आंबेडकरी अनुयायी मोठ्या संख्येने उपस्थित राहिले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विनय घोसाळे सर यांनी केले.




Post a Comment
0 Comments