Type Here to Get Search Results !

Objectives

Objectives

बळीराजासाठी अधिकारी दारी सुट्टीच्या दिवशीही कृषी कर्मचाऱ्यांची घरोघरी भेट | ‘महाविस्तार-एआय’ अॅप डाउनलोड मोहीम.

वृत्तरत्न नव महाराष्ट्र न्यूज 

प्रतिनिधी-शंकर गायकवाड

किन्हवली, दि. ५ (सा.बा.) : शेतकऱ्यांना आधुनिक, शास्त्रशुद्ध व तंत्रज्ञानाधारित कृषी सल्ला उपलब्ध करून देण्यासाठी कृषी विभागाच्या वतीने ‘महाविस्तार-एआय’ मोबाईल अॅप डाउनलोड करण्याची विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. याच अनुषंगाने शहापूर तालुक्यातील कृषी विभागाचे कर्मचारी रविवारी सुट्टी असतानाही घरोघरी जाऊन शेतकऱ्यांना अॅपविषयी माहिती देत आहेत.


राज्य शासनाच्या कृषी विभागाने शेतकऱ्यांसाठी ‘महाविस्तार-एआय’ हे अत्याधुनिक मोबाईल अॅप नुकतेच सुरू केले आहे. अँड्रॉइड मोबाईलवरील प्ले स्टोअरवरून हे अॅप डाउनलोड केल्यानंतर शेतकऱ्यांना हवामान अंदाज, मातीविषयक माहिती, कृषी सल्ला, शासकीय योजना तसेच मंडईतील ताजे बाजारभाव मराठी व इंग्रजी भाषेत एका क्लिकवर मिळत आहेत.


पेरणीची योग्य पद्धत, खतांचा समतोल वापर, पाणी व्यवस्थापन, पीक संरक्षण याबाबत वेळेवर व अचूक मार्गदर्शन या अॅपद्वारे मिळणार आहे. तसेच एआय व डिजिटल तंत्रज्ञानाच्या सहाय्याने शेती अधिक फायदेशीर व शेतकऱ्यांचे जीवनमान अधिक सुलभ करण्याच्या उद्देशाने हे अॅप विकसित करण्यात आले आहे.

हे अॅप शेतकऱ्यांसाठी एक डिजिटल क्रांती ठरणार असून जास्तीत-जास्त शेतकऱ्यांनी त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन शहापूर कृषी अधिकारी रमेश सुरशे, सहाय्यक कृषी अधिकारी नेहा खुटाडे व ग्रामपंचायत सदस्या अपर्णा पतंगराव यांनी केले आहे.


२९ हजार नोंदणीचे उद्दिष्ट

शहापूर तालुक्यात ॲग्रीस्टॅक अंतर्गत सुमारे २९ हजार शेतकऱ्यांची नोंदणी करण्याचे उद्दिष्ट असून महाविस्तार अॅपसाठीही तेवढ्याच नोंदणीचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. सध्या तालुक्यात साडेआठ हजारांहून अधिक शेतकऱ्यांनी अॅपवर नोंदणी केली असून मोहिमेला उत्तम प्रतिसाद मिळत असल्याची माहिती तालुका कृषी अधिकारी कुमार जाधव यांनी दिली.



Post a Comment

0 Comments