वृत्तरत्न नव महाराष्ट्र न्यूज
कांदळी, भिवंडी | प्रतिनिधी-शंकर गायकवाड
जिल्हा परिषद शाळा कांदळी, ता. भिवंडी येथे दि. ७ फेब्रुवारी २०२६ रोजी त्यागमूर्ती माता रमाई यांची जयंती उत्साहात व प्रेरणादायी वातावरणात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाची सुरुवात माता रमाई यांच्या प्रतिमेस ग्रामपंचायत कांदळीच्या सरपंच नम्रता जाधव यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून करण्यात आली, तर दीपप्रज्वलन शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा प्रगती दळवी यांच्या हस्ते झाले.
यावेळी सरपंच नम्रता जाधव व शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा प्रगती दळवी यांचे शाल व पुष्पहार देऊन जयश्री पष्टे मॅडम यांच्या हस्ते स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक वरिष्ठ शिक्षिका जयश्री पष्टे मॅडम यांनी केले. शिक्षक अशोक गायकवाड यांनी माता रमाई यांच्या त्यागमय जीवनकार्यावर प्रबोधनपर मार्गदर्शन करून उपस्थितांना प्रेरित केले. विद्यार्थ्यांनी माता रमाई यांच्या जीवनावर भाषणे सादर केली तसेच रमाई गीतावर सुंदर नृत्य सादर करून कार्यक्रमाची शोभा वाढवली.
माता रमाई जयंतीचे औचित्य साधून शिक्षक अशोक गायकवाड यांनी शाळेस माता रमाई यांची प्रतिमा भेट दिली. कार्यक्रमानंतर विद्यार्थ्यांना खाऊ म्हणून बिस्किट व चॉकलेटचे वाटप करण्यात आले. शेवटी शिक्षक अशोक गायकवाड यांनी उपस्थितांचे आभार मानले.
या कार्यक्रमाला ग्रामपंचायत कांदळीच्या सरपंच नम्रता जाधव, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा प्रगती दळवी, अंगणवाडी सेविका कविता जाधव, अंगणवाडी मदतनीस गोदावरी जाधव, मुख्य शिक्षिका जयश्री पष्टे, शिक्षक अशोक गायकवाड तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.



Post a Comment
0 Comments