प्रतिनिधी - शंकर गायकवाड
दि. १४ ऑक्टोबर २०२३ रोजी नगरातील फुले चौक येथे झालेल्या बैठकीत “डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर प्रवेशद्वार” कमान उभारण्याचा मुद्दा ठामपणे मांडण्यात आला होता. या वेळी सर्व समाजातील बंधू-भगिनींनी सकारात्मक पाठिंबा दर्शवत एकजुटीची भूमिका घेतली होती.
यानंतर रमाई जयंतीनिमित्त शाळेजवळील कार्यक्रमात स्पष्ट इशारा देण्यात आला होता की, बाबासाहेबांच्या जयंतीपूर्वी कमानीचे काम पूर्ण न झाल्यास नगरपरिषद प्रशासनाविरोधात तीव्र मोर्चा काढण्यात येईल.
गेल्या ३० ते ४० वर्षांपासून नगराला “डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर” हे नाव असूनही प्रवेशद्वारावर कमान नसल्याची खंत नागरिकांमध्ये होती. मात्र आता हा प्रश्न मार्गी लागत असल्याची आनंदाची माहिती देण्यात आली आहे. सर्व समाजबांधवांच्या एकीच्या बळावर आणि स्थानिक कार्यकर्त्यांच्या सहकार्यामुळे स्थानिक लोकप्रतिनिधींनी नगरात भेट देऊन भीमजयंतीपूर्वी कमानीचे काम पूर्ण करण्याचा प्रयत्न राहील, अशी ग्वाही दिली आहे.
लवकरच “डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर प्रवेशद्वार” कमान अभिमानाने उभी राहील, तसेच त्या परिसरातील कचरा कुंडीही हटवली जाईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.
कमान प्रश्नावर सहकार्यात्मक व सकारात्मक भूमिका घेतल्याबद्दल नगरसेविका अमृताताई मोहोरीकर, नगरसेविका श्यामलाताई मंचेकर, मा. अजयदादा मोहोरीकर तसेच सर्व स्थानिक सहकारी समाजसेवक, कार्यकर्ते आणि मित्रमंडळी यांचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले.
हा प्रश्न अंतिम निर्णयापर्यंत मार्गी लागेपर्यंत पाठपुरावा आणि लढा सुरूच राहील, असा निर्धारही यावेळी व्यक्त करण्यात आला. 🙌

Post a Comment
0 Comments