प्रतिनिधी - शंकर गायकवाड
लातूर/औसा, दि. 27 — लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यातील टाका येथील 11 वर्षीय दलित विद्यार्थिनी अनुष्का पाटोळे हिच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणाची सीआयडीमार्फत सखोल चौकशी करावी, अशी मागणी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री व रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष Ramdas Athawale यांनी केली आहे.
लातूर येथील Jawahar Navodaya Vidyalaya येथे इयत्ता सहावीत शिक्षण घेणाऱ्या अनुष्काचा विद्यालयातच संशयास्पद मृत्यू झाला होता. हा मृत्यू आत्महत्या नसून हत्या असल्याचा गंभीर आरोप तिच्या कुटुंबीयांनी केला आहे. या पार्श्वभूमीवर ना. आठवले यांनी टाका गावातील पाटोळे कुटुंबीयांच्या निवासस्थानी जाऊन सांत्वनपर भेट घेतली आणि अनुष्काच्या प्रतिमेस पुष्पांजली अर्पण करून भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली.
मुख्यमंत्री व केंद्रीय शिक्षण मंत्र्यांची भेट घेणार
या प्रकरणाची सीआयडी चौकशी व्हावी यासाठी आपण राज्याचे मुख्यमंत्री Devendra Fadnavis यांची तातडीने भेट घेणार असून त्यांना पत्र देऊन मागणी करणार असल्याचे ना. आठवले यांनी स्पष्ट केले. तसेच केंद्रीय शिक्षण मंत्री Dharmendra Pradhan यांचीही भेट घेऊन या प्रकरणात न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
“अत्यंत हुशार मुलगी, आत्महत्या अशक्य”
अनुष्का पाटोळे ही अत्यंत हुशार विद्यार्थिनी होती. अवघ्या साडेअकरा वर्षांची असताना तिने गुणवत्तेवर नवोदय विद्यालयात प्रवेश मिळवला होता. तिला भारतीय संविधान तोंडपाठ होते तसेच महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जीवनावर ती प्रभावी भाषण करीत असे, अशी माहिती कुटुंबीयांनी दिली.
केवळ सहा महिन्यांतच तिचा विद्यालयात संशयास्पद मृत्यू झाल्याने अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. अवघ्या 11 वर्षांची मुलगी टॉवेलने गळफास कसा घेऊ शकते? बसलेल्या अवस्थेत गळफास कसा शक्य आहे? मृतदेह पोलीस पंचनाम्याविना रुग्णालयात का नेण्यात आला? मुलींच्या वसतिगृहाबाहेरील सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध का नाही? असे सवाल कुटुंबीयांनी उपस्थित केले आहेत.
सर्व जबाबदारांवर कारवाईची मागणी
या प्रकरणात केवळ दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. मात्र विद्यालयाचे प्राचार्य, शिक्षक, शेफ, वॉचमन व इतर कायमस्वरूपी कर्मचाऱ्यांची सखोल चौकशी करून जबाबदारांवर गुन्हे दाखल करण्यात यावेत, अशी मागणी ना. आठवले यांनी केली. “दोषींना कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे,” असेही त्यांनी ठामपणे सांगितले.
आर्थिक मदतीची घोषणा
रिपब्लिकन पक्षाच्या वतीने पाटोळे कुटुंबास 1 लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. तसेच राज्य सामाजिक न्याय विभागामार्फत एकूण 4 लाख रुपयांची मदत देण्यात येणार असून त्यापैकी 1 लाख रुपयांचा पहिला हप्ता देण्यात आल्याची माहिती ना. आठवले यांनी दिली. उर्वरित रक्कम टप्प्याटप्प्याने दिली जाईल.
मुख्यमंत्री सहायता निधीतूनही आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी तसेच कुटुंबातील एका व्यक्तीस शासकीय नोकरी देण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
मान्यवरांची उपस्थिती
यावेळी रिपब्लिकन पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष राजा सरवदे, युवक राज्य अध्यक्ष पप्पू कागदे, राज्य सचिव चंद्रकांत चिकटे, डॉ. सुधाकर गुळवे, औसा तालुका अध्यक्ष सिद्धार्थ कांबळे यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
अनुष्का पाटोळेच्या मृत्यूची सत्यता समोर येऊन कुटुंबीयांना न्याय मिळावा, अशी अपेक्षा सर्व स्तरातून व्यक्त होत आहे.


Post a Comment
0 Comments