प्रतिनिधी - मनोहर गायकवाड
मुंबईत झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणी बैठकीत पक्षाच्या नेतृत्वात महत्त्वाचा बदल करण्यात आला. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची एकमताने पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड जाहीर करण्यात आली. ही निवड आवाजी मतदानाद्वारे पार पडली.
मुंबईतील वरळी डोम येथे झालेल्या बैठकीस पक्षाचे प्रमुख नेते आणि पदाधिकारी उपस्थित होते. यामध्ये प्रफुल पटेल, सुनील तटकरे, छगन भुजबळ, धनंजय मुंडे, दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ, नरहरी झिरवाळ आणि पार्थ पवार यांचा समावेश होता.
राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी प्रफुल पटेल यांचे नाव चर्चेत होते. पक्षातील काही आमदारांचा त्यांना पाठिंबा असल्याचे बोलले जात होते. मात्र, पक्षात पवार कुटुंबातीलच नेतृत्व राहावे, अशी भूमिका पुढे आल्याने त्यांनी स्पर्धेतून माघार घेतली. विशेष म्हणजे, अध्यक्षपदासाठीचा प्रस्ताव स्वतः प्रफुल पटेल यांनीच मांडला आणि त्याला प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी अनुमोदन दिले.
अजित पवार यांच्या निधनानंतर पक्षात निर्माण झालेल्या परिस्थितीत सहानुभूतीची लाट आणि एकसंध नेतृत्वाची गरज लक्षात घेऊन सुनेत्रा पवार यांनी जबाबदारी स्वीकारली.
पक्षातील अनेक आमदारांनी त्यांना पुढे येण्याची विनंती केली होती. अखेर सर्वानुमते त्यांची निवड जाहीर करण्यात आली.
या निर्णयामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नव्या नेतृत्वाखाली संघटनात्मक बळकटी मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.


Post a Comment
0 Comments