मुंबई, दि. 4 मार्च (प्रतिनिधी):
लहुजी नगर, शेगाव (जि. बुलढाणा) येथील झोपडपट्टीधारकांच्या पुनर्वसनाच्या मागणीसाठी मागासवर्गीय वंचित संघ, पुणे तसेच राष्ट्रीय स्वाभिमान मातंग संघटना यांच्या वतीने मुंबईतील आझाद मैदान, मंत्रालय येथे बेमुदत आमरण उपोषण आंदोलन करण्यात येत आहे.
शेगाव येथील लहुजी नगर परिसरातील सुमारे 150 पेक्षा अधिक झोपडपट्टीधारकांचा पुनर्वसनाचा प्रश्न अद्याप प्रलंबित असून संबंधित कुटुंबांना अद्याप पर्यायी जागा किंवा शासकीय घरकुल उपलब्ध करून देण्यात आलेले नाही. दि. 4 मार्च 2025 रोजी झोपड्या हटविण्याची कारवाई करण्यात आल्यानंतर अनेक कुटुंबे बेघर झाली असून त्यांचे हाल होत असल्याची माहिती संघटनेच्या वतीने देण्यात आली.
झोपडपट्टी सुरक्षा दल, विदर्भ यांनी या संदर्भात प्रशासनाकडे वारंवार निवेदने देऊनही आजपर्यंत कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही. सर्वोच्च न्यायालयाच्या Olga Tellis v. Bombay Municipal Corporation आणि Sudama Singh v. Government of Delhi या महत्त्वपूर्ण निर्णयांनुसार पुनर्वसनाशिवाय झोपड्या हटविणे हे मूलभूत अधिकारांचे उल्लंघन असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. मात्र, स्थानिक प्रशासनाने या संदर्भात आवश्यक प्रक्रिया पूर्ण केलेली नसल्याचा आरोप करण्यात आला आहे.
या आंदोलनाद्वारे संघटनेने काही प्रमुख मागण्या पुढे केल्या आहेत. त्यामध्ये सर्व पात्र झोपडपट्टीधारकांचे तात्काळ सर्वेक्षण व पात्रता तपासणी करणे, प्रत्येक कुटुंबाला पर्यायी जागा किंवा शासकीय घरकुल देणे, जबाबदार अधिकाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करणे तसेच पुनर्वसन होईपर्यंत तात्पुरती निवारा व्यवस्था उपलब्ध करून देणे या मागण्यांचा समावेश आहे.
दरम्यान, प्रशासनाने तात्काळ निर्णय घेतला नाही तर न्यायालयीन लढा उभारण्यात येईल आणि व्यापक लोकआंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे.
या आंदोलनाबाबत माहिती देताना गजानन ओ. तायडे (विदर्भ अध्यक्ष, झोपडपट्टी सुरक्षा दल महाराष्ट्र), राजू मानकर (राष्ट्रीय स्वाभिमान मातंग संघटना) आणि मोहनराव कांबळे (मागासवर्गीय वंचित संघ) यांनी आंदोलन सुरू असल्याचे सांगितले.



Post a Comment
0 Comments