शहापूर : प्रतिनिधी-शंकर गायकवाड
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या शहापूर शहर शाखेच्या वतीने शहापूर नगरपंचायतीकडे उंच व बहुमजली इमारतींमधील सुरक्षाविषयक उपाययोजनांबाबत महत्त्वाचे निवेदन सादर करण्यात आले आहे. शहरप्रमुख विजय रामचंद्र देशमुख यांच्या नेतृत्वाखाली हे निवेदन मुख्याधिकारी शिवराज गायकवाड यांच्याकडे देण्यात आले.
नगररचना विभाग व अग्निशमन दलाच्या नियमांनुसार ठराविक उंचीपेक्षा जास्त असलेल्या इमारतींमध्ये आपत्कालीन निर्गमन मार्ग (Emergency Exit/Fire Escape Staircase) तसेच अग्निरोधक यंत्रणा (Fire Fighting System) असणे बंधनकारक आहे. मात्र, शहरातील अनेक इमारतींमध्ये या सुविधा केवळ कागदोपत्री असून प्रत्यक्षात कार्यान्वित नसल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
शहापूर शहराचा झपाट्याने विस्तार होत असून उंच इमारतींची संख्या वाढत आहे. अशा परिस्थितीत संभाव्य आग दुर्घटनांच्या वेळी रहिवाशांच्या जीवितास मोठा धोका निर्माण होऊ शकतो. आपत्कालीन जिन्यांची अनुपस्थिती किंवा अपुरी यंत्रणा असल्यास बचावकार्यांत अडथळे निर्माण होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
या पार्श्वभूमीवर शिवसेनेने नगरपंचायतीकडे दोन प्रमुख मागण्या केल्या आहेत. शहरातील सर्व उंच इमारतींचे तात्काळ फायर ऑडिट करण्यात यावे, तसेच ज्या इमारतींमध्ये आपत्कालीन जिना किंवा अग्निरोधक यंत्रणा नाही, त्या विकासक व गृहनिर्माण संस्थांना नोटीस बजावून आवश्यक सुविधा तातडीने कार्यान्वित करण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी करण्यात आली आहे.
शहरातील नागरिकांच्या सुरक्षेसाठी प्रशासनाने त्वरित पावले उचलावीत, अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली.

Post a Comment
0 Comments