Type Here to Get Search Results !

Objectives

Objectives

मुंबईत एनआरएमयू ट्रॅफिक रनिंग स्टाफ शाखेचे वार्षिक अधिवेशन उत्साहात संपन्न.

प्रतिनिधी : आनंद भालेराव

मुंबई : नॅशनल रेल्वे मजदूर युनियन (NRMU) ट्रॅफिक रनिंग स्टाफ शाखा, मुंबई मंडळाचे वार्षिक अधिवेशन शनिवार, दिनांक 21 मार्च 2026 रोजी सायंकाळी 4 वाजता कल्याण येथील एनआरएमयू मुख्य शाखा प्रांगणात उत्साहात पार पडले.


कार्यक्रमाची सुरुवात महापुरुषांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून वंदनाने तसेच राष्ट्रगीताने करण्यात आली. यावेळी काॅ. पी. जे. शिंदे (झोनल सचिव), काॅ. रसीक मलबारी (कार्यकारी अध्यक्ष, मुख्यालय), काॅ. बी. एल. यादव (सहायक महामंत्री, मुख्यालय), काॅ. अरुण मनोरे (कार्यकारी अध्यक्ष, ऑल इंडिया रेल्वे पेंशनर्स फेडरेशन, मुंबई मंडळ) आणि काॅ. पुष्कर पाटील (अध्यक्ष, मुंबई मंडळ) या मान्यवरांनी कामगारांना मार्गदर्शन केले.


मुख्य अतिथी म्हणून उपस्थित काॅ. वेणु पी. नायर (महामंत्री, मध्य रेल्वे व कोकण रेल्वे) यांनी कामगारांच्या विविध प्रश्नांवर सविस्तर भाष्य केले. त्यांनी आठवे वेतन आयोग, वैद्यकीय सुविधा तसेच मोटरमन व गार्ड यांच्या धोकादायक कामाच्या परिस्थितीचा उल्लेख केला. मुंबईची ‘लाईफलाईन’ असलेल्या उपनगरीय लोकल सेवा सुरळीत चालवताना हे कर्मचारी आपला जीव धोक्यात घालून प्रवाशांना सुरक्षितपणे घरी पोहोचवतात, याची जाणीव त्यांनी करून दिली.

तसेच, 44 कामगार कायदे रद्द करून केवळ 4 नवीन कामगार कायदे लागू करण्याच्या निर्णयाविरोधात सर्व कामगारांनी एकजूट दाखवण्याचे आवाहन करण्यात आले. संघटित शक्तीच्या बळावर लोकशाही मार्गाने आंदोलन, धरणे, मोर्चे अशा माध्यमातून लढा उभारण्याची गरज असल्याचा इशारा त्यांनी दिला.


यावेळी छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संघर्षमय कार्याची आठवण करून देत वंचित घटकांना न्याय मिळवून देण्याच्या त्यांच्या योगदानाचा गौरव करण्यात आला.


कार्यक्रमाच्या शेवटी शाखा सचिव काॅ. रवि कोरी यांनी उपस्थित मान्यवर व सदस्यांचे आभार मानून अधिवेशनाची सांगता केली. शेवटी “दुनिया के मजदूर एक हो”, “इन्कलाब जिंदाबाद” अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला.




Post a Comment

0 Comments