Type Here to Get Search Results !

Objectives

Objectives

ग्रामीण भागात ‘एसटी कार्ड’च्या नावाखाली वसुली; १९९ च्या कार्डासाठी ३०० रुपये घेतल्याचा आरोप

कार्यकारी संपादक - रितेश साबळे 

अकोट, प्रतिनिधी : अकोट तालुक्यातील ग्रामीण भागात महाराष्ट्र राज्य परिवहन (एसटी) कार्डच्या नावाखाली नागरिकांकडून जादा पैसे उकळले जात असल्याचा प्रकार समोर आला आहे. अधिकृत शुल्क केवळ १९९ रुपये असताना काही एजंटांकडून तब्बल ३०० रुपये वसूल केले जात असल्याची माहिती मिळत आहे.


आलेवाडी, पाटसूल, देवरी तसेच परिसरातील गावांमध्ये काही एजंट नागरिकांना कार्ड मिळवून देण्याच्या नावाखाली पैसे गोळा करत असल्याचे समोर आले आहे. “लवकर कार्ड मिळेल”, “विशेष सुविधा मिळेल” किंवा “सरकारी योजना बंद होणार आहे” अशा आमिषांद्वारे विशेषतः महिला व मुलींना लक्ष्य केले जात असल्याची तक्रार नागरिकांकडून करण्यात येत आहे.


ग्रामीण भागातील अनेकांना सरकारी प्रक्रियेची पुरेशी माहिती नसल्याचा गैरफायदा घेत “तत्काळ सेवा”च्या नावाखाली जादा रक्कम आकारली जात असल्याचा आरोप आहे. काही ठिकाणी नागरिकांना अधिकृत पावतीही दिली जात नसल्याने हा प्रकार फसवणुकीचा असल्याचे बोलले जात आहे.


दरम्यान, अकोट येथील महाराष्ट्र राज्य परिवहन विभागाचे व्यवस्थापक श्री. पिसोडे यांनी नागरिकांना सावध राहण्याचे आवाहन केले आहे. त्यांनी सांगितले की, एसटी कार्डसाठी अधिकृत शुल्क फक्त १९९ रुपये आहे. यापेक्षा जास्त रक्कम कुणालाही देऊ नये. कोणी अतिरिक्त पैसे मागितल्यास संबंधित अधिकाऱ्यांकडे तक्रार करावी.


गावोगावी खुलेआम दवंडी देऊन पैसे गोळा केले जात असल्याच्या पार्श्वभूमीवर स्थानिक प्रशासनाच्या भूमिकेवरही प्रश्न उपस्थित होत आहेत. या एजंटांवर तात्काळ कारवाई करून नागरिकांची फसवणूक थांबवावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.



Post a Comment

0 Comments