Type Here to Get Search Results !

Objectives

Objectives

प्रपोज नाकारल्याचा संताप; दीड वर्षांच्या चिमुकल्याला जमिनीवर आपटून ठार.

 


कार्यकारी संपादक । रितेश साबळे

फिरोजाबाद (उत्तर प्रदेश) : एकतर्फी प्रेमातून घडलेल्या अत्यंत धक्कादायक घटनेने संपूर्ण देश हादरला आहे. एका महिलेने लग्नाचा प्रस्ताव नाकारल्याच्या रागातून एका तरुणाने तिच्या दीड वर्षांच्या मुलाची निर्दयीपणे हत्या केल्याची घटना उत्तर प्रदेशातील फिरोजाबाद येथे घडली. या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर संतापाची लाट उसळली आहे. 


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी विराज उर्फ जितेंद्र पाठक हा मुलाच्या आईवर लग्नासाठी दबाव टाकत होता. मात्र संबंधित महिलेने आपल्याला आधीच मूल असल्याने लग्नास नकार दिला होता. याच कारणामुळे आरोपीने त्या चिमुकल्याला आपल्या मार्गातील अडथळा समजून भयंकर कट रचला. 

घटनेच्या दिवशी आरोपीने मुलाला टॉफी घेऊन देण्याचे आमिष दाखवून घराबाहेर नेले. त्यानंतर निर्जन ठिकाणी नेऊन त्याला वारंवार जमिनीवर आपटले. गंभीर जखमी झालेल्या चिमुकल्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. 


घटनेनंतर आरोपी फरार झाला होता. पोलिसांनी शोधमोहीम राबवून त्याला ताब्यात घेतले. चौकशीत आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली असून महिलेने लग्नास नकार दिल्यामुळेच आपण हे कृत्य केल्याचे सांगितले. पोलिसांनी आरोपीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे. 


या अमानुष घटनेमुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत असून आरोपीला कठोरात कठोर शिक्षा देण्याची मागणी होत आहे. 



Post a Comment

0 Comments