कार्यकारी संपादक : रितेश साबळे
औरंगाबाद । वंचित बहुजन आघाडीच्या औरंगाबाद पश्चिम जिल्ह्याच्या वतीने गंगापूर, वैजापूर, कन्नड, खुलताबाद तसेच औरंगाबाद पश्चिम तालुक्यातील तहसील कार्यालयांसमोर विविध जनहिताच्या मागण्यांसाठी जोरदार निदर्शने करण्यात आली. वाढती इंधन दरवाढ तात्काळ रद्द करावी, कांदा उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक मदत जाहीर करावी तसेच राज्य मंत्रिमंडळाने १४ मे रोजी घेतलेला आरक्षणवाद्यांच्या विरोधातील निर्णय मागे घ्यावा, या प्रमुख मागण्यांसाठी आंदोलकांनी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.
यावेळी आंदोलनकर्त्यांनी राज्य सरकारच्या धोरणांवर तीव्र नाराजी व्यक्त करत सामान्य नागरिक, शेतकरी आणि बहुजन समाजावर अन्याय होत असल्याचा आरोप केला. सतत वाढणाऱ्या इंधन दरामुळे सर्वसामान्यांचे आर्थिक गणित कोलमडले असून वाहतूक, शेती आणि दैनंदिन जीवनावश्यक वस्तूंवर त्याचा मोठा परिणाम होत असल्याचे आंदोलकांनी सांगितले.
तसेच कांदा उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडले असून शासनाने तातडीने मदत जाहीर करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी करण्यात आली. आरक्षणविरोधी निर्णयामुळे सामाजिक न्याय धोक्यात येत असल्याचा आरोप करत तो निर्णय तात्काळ रद्द करण्याची मागणीही करण्यात आली.
या आंदोलनात वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. तहसील प्रशासनाला विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले असून शासनाने लवकरात लवकर सकारात्मक निर्णय न घेतल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला.


Post a Comment
0 Comments