प्रतिनिधी : मोहन दिपके
हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ तालुक्यातील मौजे बोराळवाडी येथे अंध आदिवासी व बौद्ध समाजावर सामाजिक बहिष्कार टाकून त्यांना पिण्याचे पाणी, किराणा सामान, दूध तसेच जीवनावश्यक वस्तू नाकारण्यात आल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. या प्रकरणी नॅशनल दलित मूव्हमेंट फॉर जस्टिस (NDMJ) संघटनेने जिल्हा प्रशासनाला निवेदन देत संबंधित आरोपींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे.
NDMJ च्या निवेदनानुसार, दिनांक १२ मे २०२६ रोजी गावातील परसराम कचरू ढाकरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गावातील काही व्यक्तींविरोधात अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा तसेच भारतीय न्याय संहितेअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात महादा किशन वाबळे, खंडू भिवाजी वाबळे, शंकर भिवाजी वाबळे, पांडुरंग नारायण वाबळे, बालाजी केशव वाबळे, संभाजी भिवाजी वाबळे, अविनाश महादा वाबळे, विठ्ठल सिताराम वाबळे, महादा नारायण वाबळे व केदार महादा वाबळे यांच्यासह इतरांवर विविध कलमान्वये गुन्हे दाखल झाल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
संघटनेने आरोप केला आहे की, गुन्हा दाखल झाल्यानंतर गावातील काही लोकांनी एकत्रित बैठक घेऊन अंध आदिवासी व बौद्ध समाजावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला. संबंधित समाजाला किराणा सामान विकू नये, पिण्याचे पाणी देऊ नये तसेच दूध देण्यास नकार d्यावा, असे निर्देश गावातील काही दुकानदार व नागरिकांना देण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे.
निवेदनात पुढे म्हटले आहे ki, गावातील काही किराणा दुकानदारांनी संबंधित समाजातील नागरिकांना सामान न देता परत पाठवले. तसेच दूध डेअरीवरही दूध देण्यास नकार देण्यात आला. इतकेच नव्हे तर खासगी पाणीपुरवठा लाईनद्वारे पाणी देण्यासही काहींनी नकार दिल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे.
या प्रकरणात गावातील तब्बल ३९ जणांनी संगनमत करून सामाजिक बहिष्कार घातल्याचा आरोप करण्यात आला असून, या सर्वांवर अॅट्रॉसिटी कायदा व भारतीय न्याय संहितेअंतर्गत गुन्हे दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे.
दरम्यान, परसराम कचरू ठाकरे यांनी दाखल केलेल्या अॅट्रॉसिटी प्रकरणानंतर त्यांच्याविरोधातही खोटा गुन्हा दाखल करण्यात आल्याचा आरोप संघटनेने केला आहे. त्यामुळे दोन्ही प्रकरणांचा तपास अॅट्रॉसिटी कायद्याच्या तरतुदीनुसार एकाच वरिष्ठ अधिकाऱ्याकडून करण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
NDMJ ने प्रशासनाकडे खालील प्रमुख मागण्या केल्या आहेत :
सर्व आरोपींना तात्काळ अटक करण्यात यावी.
अंध आदिवासी व बौद्ध समाजाला पिण्याचे पाणी, किराणा व जीवनावश्यक वस्तू तातडीने उपलब्ध करून द्याव्यात.
गावात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात यावा.
जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक व समाजकल्याण विभागाने तातडीने गावाला भेट द्यावी.
सामाजिक तणाव वाढू नये यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात.
संघटनेने इशारा दिला आहे की, मागण्यांवर तात्काळ कार्यवाही न झाल्यास दिनांक २५ मे २०२६ रोजी जिल्हाधिकारी कार्यालय, हिंगोली समोर तीव्र आंदोलन करण्यात येईल.
या निवेदनावर जगदीप वसंतराव दिपके, मोहन मदन दिपके, धर्मदीप नामदेव कुऱ्हे, करण रोहिदास कुऱ्हे, दलित नामदेव दिपके यांच्यासह अनेक ग्रामस्थांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Post a Comment
0 Comments