प्रतिनिधी : रितेश साबळे
नवी दिल्ली : सध्या सोशल मीडियावर “सीजीपी” अर्थात Cockroach Janta Party (CJP) किंवा “कॉकरोच जनता पार्टी” हा शब्द प्रचंड ट्रेंड होत असून तरुणांमध्ये या डिजिटल चळवळीची मोठी चर्चा सुरू आहे. सुरुवातीला विनोदी मीम आणि व्यंगात्मक मोहिम म्हणून सुरू झालेली ही संकल्पना आता बेरोजगारी, शिक्षण व्यवस्था, महागाई, अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि युवकांच्या नाराजीचे प्रतीक बनत असल्याचे दिसत आहे.
ही कोणती अधिकृत निवडणूक आयोगात नोंदणीकृत राजकीय पार्टी नसून सोशल मीडिया-आधारित व्यंगात्मक डिजिटल आंदोलन मानले जात आहे. विशेषतः इंस्टाग्राम, एक्स (ट्विटर) आणि इतर प्लॅटफॉर्मवर या “पार्टी”चे फॉलोअर्स काही दिवसांत लाखोंमध्ये पोहोचल्यामुळे राष्ट्रीय पातळीवर याची चर्चा रंगली आहे.
*कॉकरोच जनता पार्टीची सुरुवात कशी झाली?अभिजीत दिपके कोण? सोशल मीडियावरील चर्चेचा केंद्रबिंदू*
कॉकरोच जनता पार्टीच्या वाढत्या लोकप्रियतेमागे अभिजीत दिपके हे नाव विशेष चर्चेत आले आहे. पिंपरी गावातील असलेले अभिजीत दिपके सध्या अमेरिकेत उच्च शिक्षण घेत असल्याची माहिती समोर आली आहे. सोशल मीडियावरील व्यंगात्मक आणि युवकांच्या प्रश्नांना थेट स्पर्श करणाऱ्या त्यांच्या पोस्टमुळे अल्पावधीतच “Cockroach Janta Party” या मोहिमेला मोठी प्रसिद्धी मिळाली.
विशेष म्हणजे, या डिजिटल मोहिमेच्या सोशल मीडिया अकाउंटला अवघ्या तीन दिवसांत तब्बल १३ मिलियनपेक्षा अधिक फॉलोअर्स मिळाल्याची जोरदार चर्चा रंगली होती. त्यानंतरही या फॉलोअर्सची संख्या झपाट्याने वाढत असून, सध्या ही मोहिम सोशल मीडियावरील सर्वाधिक चर्चेत असलेल्या ट्रेंडपैकी एक ठरत आहे. युवक, मीम क्रिएटर्स आणि विविध सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्सकडून या मोहिमेला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळताना दिसत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सर्वोच्च न्यायालयातील एका सुनावणीदरम्यान बेरोजगार तरुणांबाबत करण्यात आलेल्या “कॉकरोच” संदर्भातील कथित वक्तव्यानंतर सोशल मीडियावर संताप व्यक्त करण्यात आला. त्यानंतर काही युवकांनी व्यंगात्मक पद्धतीने “Cockroach Janta Party” ही संकल्पना पुढे आणली.
या आंदोलनाचा प्रमुख चेहरा म्हणून अभिजीत दिपके यांचे नाव पुढे आले आहे. त्यांनी सुरुवातीला हे फक्त एक इंटरनेट जोक आणि मीम संस्कृतीचा भाग असल्याचे सांगितले होते; मात्र युवकांचा प्रतिसाद वाढल्यानंतर ते मोठ्या डिजिटल मोहिमेत रूपांतरित झाले.
या पार्टीचे उद्दिष्ट काय?
कॉकरोच जनता पार्टी स्वतःला “युवकांचा आवाज” म्हणून सादर करत आहे. या डिजिटल मोहिमेमध्ये खालील मुद्द्यांवर विशेष भर दिला जात असल्याचे दिसते —
बेरोजगारी आणि नोकरीचा प्रश्न
शिक्षण व्यवस्थेतील कथित त्रुटी
NEET परीक्षा व पेपर लीक प्रकरण
महागाई आणि आर्थिक ताण
अभिव्यक्ती स्वातंत्र्य
सोशल मीडियावरून व्यंगात्मक आंदोलन
या मोहिमेचे घोषवाक्य “Youth, By the Youth, For the Youth” अशा स्वरूपात सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे.
तरुणांमध्ये एवढी लोकप्रियता का?
विशेषतः Gen-Z आणि महाविद्यालयीन युवकांनी या मोहिमेला मोठा प्रतिसाद दिला आहे. मीम, डार्क ह्युमर आणि राजकीय व्यंग यांच्या माध्यमातून युवक स्वतःची नाराजी व्यक्त करत असल्याचे चित्र आहे. काही दिवसांत इंस्टाग्रामवर या मोहिमेचे फॉलोअर्स अनेक मोठ्या राजकीय पक्षांपेक्षा जास्त झाल्याचा दावा विविध माध्यमांतून करण्यात आला आहे.
ही खरोखर राजकीय पार्टी आहे का?
सध्या उपलब्ध माहितीनुसार, ही अधिकृत नोंदणीकृत राजकीय पार्टी नसून सोशल मीडिया-आधारित व्यंगात्मक चळवळ आहे. मात्र, काही जण याकडे भविष्यातील डिजिटल राजकारणाचे संकेत म्हणून पाहत आहेत. तर काही विश्लेषकांच्या मते, सोशल मीडियावरील लोकप्रियता प्रत्यक्ष निवडणुकीतील मतांमध्ये रूपांतरित होईलच असे नाही.
वाद आणि चर्चाही वाढल्या
या मोहिमेच्या फॉलोअर्सबाबत काही सोशल मीडिया वापरकर्त्यांनी बनावट किंवा परदेशी अकाउंट्सचे आरोप केले; मात्र आंदोलनाशी संबंधित व्यक्तींनी ते फेटाळून लावले आहेत.
दरम्यान, “Oggy Janta Party” नावाने आणखी एक व्यंगात्मक ट्रेंडही सोशल मीडियावर समोर आला असून इंटरनेटवर मीम युद्ध रंगताना दिसत आहे.
डिजिटल युगातील नवे राजकारण?
कॉकरोच जनता पार्टी ही केवळ विनोदी ट्रेंड नसून युवकांच्या नाराजीचा डिजिटल उद्रेक असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. सोशल मीडिया हे आता फक्त मनोरंजनाचे माध्यम न राहता डिजिटल आंदोलनांचे प्रभावी व्यासपीठ बनत असल्याचे या प्रकरणातून स्पष्ट होत आहे.

Post a Comment
0 Comments