प्रतिनिधी | शहापूर
राज्य सरकारकडून अनुसूचित जाती (SC) समाजाच्या उपवर्गीकरणाचा (अ, ब, क, ड विभागणी) निर्णय घेण्याच्या हालचालींविरोधात रिपब्लिकन सेना शहापूर तालुक्याच्या वतीने तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला आहे. यासंदर्भात शहापूरचे तहसीलदार मा. परमेश्वर कासुळे साहेब तसेच पोलीस निरीक्षक मा. कदम साहेब यांना निवेदन सादर करण्यात आले.
रिपब्लिकन सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, अनुसूचित जातींमध्ये उपवर्गीकरण करण्याचा निर्णय हा संविधानाच्या मूलभूत तत्वांच्या विरोधात असून त्यामुळे बहुजन समाजाच्या एकतेला तडा जाऊ शकतो. तसेच हा निर्णय डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना धक्का देणारा असल्याचा आरोपही करण्यात आला.
या निर्णयामुळे समाजात जातीय तेढ निर्माण होण्याची शक्यता असून राज्य सरकारने तात्काळ हा निर्णय मागे घ्यावा, अशी मागणी रिपब्लिकन सेना शहापूर तालुक्याच्या वतीने करण्यात आली आहे.
यावेळी शहापूर तालुका अध्यक्ष रविंद्र जाधव, तालुका नेते विकास अभंग, उपाध्यक्ष मनोज जाधव, मयूर जाधव, अल्पसंख्याक अध्यक्ष शाहिद शेख, युवा अध्यक्ष दिपकेश उबाळे, शुभम जगताप, नितीन जाधव आदी पदाधिकारी उपस्थित होते.


Post a Comment
0 Comments