प्रतिनिधी :कल्याण
कल्याण पश्चिमेतील पारनाका परिसरात घडलेल्या एका धक्कादायक घटनेने संपूर्ण शहर हादरले आहे. ‘रचना रॉयल’ इमारतीमध्ये राहणाऱ्या एका व्यक्तीने स्वतःच्या २५ वर्षीय विवाहित मुलीची धारदार शस्त्राने हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. मृत तरुणीचे नाव गायत्री शिंदे असे असून, या प्रकरणानंतर परिसरात खळबळ उडाली आहे.
माहितीनुसार, गायत्री काही दिवसांपूर्वी माहेरी आली होती. घटनेच्या आदल्या दिवशी संपूर्ण कुटुंब एकत्र बाहेर फिरून आनंदात वेळ घालवत असल्याचे सांगितले जात आहे. मात्र सोमवारी दुपारी तिची आई कामानिमित्त बाहेर गेल्यानंतर घरात गायत्री आणि तिचे वडील विनोद वसईकर हे दोघेच उपस्थित होते.
सायंकाळी आई घरी परतल्यानंतर तिला गायत्रीचा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला मृतदेह दिसून आला. या भीषण प्रकारानंतर घरातील वातावरण हादरून गेले. दरम्यान, आरोपी विनोद वसईकर घटनास्थळावरून पसार झाल्याचे समोर आले आहे.
इमारतीतील सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर आरोपी दुपारच्या सुमारास घाईघाईने इमारतीबाहेर जाताना दिसल्याची माहिती पोलिसांनी दिली. मृत तरुणीच्या पतीने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला असून, कौटुंबिक वादातून ही हत्या झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
फरार आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी तीन विशेष पथके तयार केली असून पुढील तपास सुरू आहे.

Post a Comment
0 Comments