प्रतिनिधी : शंकर गायकवाड
कल्याण : नवी मुंबई पोलिस आणि खडकपाडा पोलिसांच्या संयुक्त पथकाने पहाटेच्या सुमारास राबवलेल्या धाडसी कोंबिंग ऑपरेशनमध्ये दोन सराईत इराणी गुन्हेगारांना अटक करण्यात आली. या कारवाईमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून गुन्हेगारी विश्वाला मोठा धक्का बसला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नवी मुंबई परिसरातील चोरी व दरोड्याच्या अनेक गुन्ह्यांमध्ये फरार असलेले आरोपी कल्याणजवळील आंबिवली येथील इराणी वस्तीत लपून बसल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार मंगळवारी पहाटे सुमारे ४.३० वाजता मोठ्या पोलिस बंदोबस्तासह विशेष मोहीम राबवण्यात आली. या कारवाईत जवळपास ७० पोलिस कर्मचारी सहभागी झाले होते.
अत्यंत नियोजनबद्ध आणि गुप्त पद्धतीने करण्यात आलेल्या या ऑपरेशनमध्ये मुसा सय्यद आणि काबुलअली जाफर या दोन सराईत आरोपींना ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आले. दोघांवर चोरी, दरोडा आणि इतर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली आहे. सध्या पोलिसांकडून त्यांची सखोल चौकशी सुरू असून आणखी काही गुन्ह्यांचा उलगडा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, आंबिवलीतील इराणी वस्ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. यापूर्वीही या परिसरातून अनेक फरार आणि सराईत गुन्हेगारांना अटक करण्यात आली होती. खडकपाडा पोलिसांनी याआधी शंभरहून अधिक आरोपींना पकडून विविध राज्यांतील पोलिसांच्या ताब्यात दिल्याची माहिती आहे.
या ताज्या कारवाईनंतर डोंबिवलीतील पालावा परिसरासह अन्य भागांमध्येही संशयितांचा शोध घेण्यासाठी तपास आणि शोधमोहीम सुरू असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.

Post a Comment
0 Comments