Type Here to Get Search Results !

Objectives

Objectives

बीडमध्ये मातंग समाजातील तरुणाच्या अमानुष हत्येप्रकरणी संताप.

 

पीडित कुटुंबाला आर्थिक मदत व शासकीय नोकरी द्या; वंचित बहुजन युवा आघाडीची समाज कल्याण आयुक्तांकडे मागणी



बीड | प्रतिनिधी-शंकर गायकवाड 

बीड जिल्ह्यातील शिवाजीनगर पोलीस ठाणे हद्दीतील बालेपीर परिसरात उमेश नवनाथ दळवी (वय ३४, रा. बांगरनाला, बालेपीर, बीड) या मातंग समाजातील तरुणाची दोरीने बांधून अमानुष मारहाण करत निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात संतापाची लाट उसळली असून दलित समाजात तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.


या प्रकरणी वंचित बहुजन युवा आघाडी, महाराष्ट्र प्रदेशच्या वतीने समाज कल्याण आयुक्त दिपा मुधोळ यांना निवेदन देण्यात आले. संघटनेचे पदाधिकारी विशाल गवळी यांनी पीडित कुटुंबाला तातडीने आर्थिक मदत, शासकीय नोकरी आणि दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली.


निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, उमेश दळवी यांची हत्या अवैध मद्यविक्रीच्या ठिकाणी करण्यात आली असून त्यांना दोरीने बांधून अमानुष मारहाण करण्यात आली. घटनेनंतर नातेवाईकांना एफआयआर नोंदवण्यासाठी आंदोलन करावे लागल्याचा गंभीर आरोपही करण्यात आला आहे.


संघटनेने अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा १९८९ अंतर्गत तातडीने कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. तसेच संबंधित पोलीस अधिकाऱ्यांनी कर्तव्यात हलगर्जीपणा केल्याचा आरोप करत त्यांच्यावरही SC/ST Act कलम ४ आणि भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १६६A अंतर्गत गुन्हे दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे.


याशिवाय, प्रकरणाची सुनावणी फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून तातडीने दोषारोपपत्र दाखल करावे, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली. उमेश दळवी यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाहाचा आधार हरपल्याने शासनाच्या अनुकंपा तत्त्वावरील धोरणानुसार कुटुंबातील एका सदस्याला शासकीय नोकरी देण्यात यावी, अशीही मागणी करण्यात आली आहे.


या घटनेमुळे बीड जिल्ह्यात सामाजिक वातावरण तापले असून विविध सामाजिक संघटनांकडून निषेध व्यक्त केला जात आहे. दोषींना कठोर शिक्षा आणि पीडित कुटुंबाला न्याय मिळावा, अशी मागणी जोर धरत आहे.



Tags

Post a Comment

0 Comments