कार्यकारी संपादक : रितेश साबळे
छत्रपती संभाजीनगर, २७ मे : जवाहर कॉलनी येथे त्यागमूर्ती माता रमाई भीमराव आंबेडकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त रिपब्लिकन पार्टी ऑफ महाराष्ट्र (RPM) पक्षाच्या वतीने अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी माता रमाई यांच्या त्यागमय, संघर्षशील आणि प्रेरणादायी जीवनकार्याला उजाळा देण्यात आला.
कार्यक्रमात पक्षाचे जिल्हाप्रमुख दिनेश गवळे यांनी माता रमाई यांच्या जीवनावर प्रकाश टाकत त्यांच्या त्याग, संघर्ष आणि मूक सेवेला अभिवादन केले. मार्गदर्शन करताना ते म्हणाले, “बाबासाहेबांना ‘बाबासाहेब’ बनविण्यामागे माता रमाई यांचा मोठा त्याग होता. बाबासाहेब घडले, कारण रमाई झिजल्या. उपाशी राहून, कष्ट करून त्यांनी बाबासाहेबांच्या शिक्षणाचा यज्ञ अखंडपणे सुरू ठेवला. आज RPM चा प्रत्येक कार्यकर्ता रमाई यांच्या त्यागातून प्रेरणा घेऊन समाजातील शेवटच्या घटकासाठी संघर्ष करत आहे. रमाईंचे विचार हीच RPM ची ऊर्जा आहे.”
यापूर्वी पक्षाच्या महिला आघाडीच्या शहराध्यक्ष मानसी म्हस्के यांनी माता रमाई यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
यावेळी राज्य सहसचिव वैभव लोखंडे, मराठवाडा उपाध्यक्ष सुनील खरात, मराठवाडा कार्याध्यक्ष सचिन नवगिरे, जिल्हा सचिव रवि मोरे, ज्येष्ठ नेते प्रकाश घोरपडे, महिला आघाडीचे पूर्व शहराध्यक्ष राहुल खरात, शहर संघटक फईम शेख, सुनील वाहुळ, राजकुमार साळवे, विशाल गाडे यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
माता रमाई यांच्या संघर्षमय जीवनाचा आणि समाजकार्याचा गौरव करत उपस्थितांनी त्यांना भावपूर्ण आदरांजली अर्पण केली.

Post a Comment
0 Comments