प्रतिनिधी-शंकर गायकवाड
पालघर : बोईसर येथील बेरोजगार संस्था आणि अन्यायग्रस्त पीडित महिला व्यावसायिकांच्या प्रश्नांवर वंचित बहुजन आघाडीने आक्रमक भूमिका घेतली असून, पीडित महिलांना न्याय मिळवून देण्यासाठी पक्षाने आंदोलन तीव्र करण्याचा इशारा दिला आहे.
दि. २४ मे २०२६ रोजी वंचित बहुजन आघाडी वसई-विरार महानगरपालिका क्षेत्राच्या महिला अध्यक्षा गीता जाधव, सचिव दिपाली जाधव, वसई तालुका अध्यक्ष रंजीत सोनवणे, तालुका उपाध्यक्ष भरत मोरे तसेच आजीवन सभासद अमोल घाडगे यांनी बोईसर येथे जाऊन अन्यायग्रस्त आणि पीडित महिला व्यावसायिकांची भेट घेतली. यावेळी त्यांनी महिलांचे सांत्वन करत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या.
यावेळी बोलताना गीताताई जाधव यांनी, “वंचित बहुजन आघाडी पक्षाच्या वतीने पीडित महिलांना न्याय मिळवून दिल्याशिवाय माघार घेतली जाणार नाही,” असे ठाम आश्वासन दिले. त्यांच्या या भूमिकेमुळे पीडित महिला व्यावसायिकांचे मनोधैर्य वाढल्याचे सांगण्यात आले.
सदर प्रकरणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने सुरू असलेल्या बेमुदत धरणे आंदोलनाला तब्बल १५ दिवस पूर्ण झाले आहेत. मात्र, अद्याप शासकीय व प्रशासकीय अधिकाऱ्यांनी आंदोलनाची किंवा महिलांच्या मागण्यांची कोणतीही दखल घेतलेली नसल्याचा आरोप पदाधिकाऱ्यांनी केला आहे. त्यामुळे संबंधित महिलांवर उपासमारीची वेळ आली असून, त्यांना तातडीने नुकसान भरपाई देऊन पुनर्वसन करण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे.
दरम्यान, या प्रकरणी न्याय न मिळाल्यास आंदोलन अधिक उग्र स्वरूपात केले जाईल, असा इशाराही वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी दिला. तसेच सोमवार, दि. २५ मे २०२६ रोजी पक्षाचे शिष्टमंडळ पालघर जिल्ह्याचे सीईओ यांची भेट घेऊन महिलांच्या प्रश्नांबाबत निवेदन सादर करणार असल्याची माहिती गीता जाधव यांनी दिली.
पीडित महिलांच्या प्रश्नांची तातडीने दखल घेतल्याबद्दल पालघर जिल्हा अध्यक्ष शिवविलास सोनकांबळे, आम्रपाली संस्थेच्या अध्यक्षा वैजयंतीमाला सोनकांबळे तसेच वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी गीता जाधव व सर्व पदाधिकाऱ्यांचे आभार मानले.


Post a Comment
0 Comments