ठाणे (प्रतिनिधी) : दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभेच्या ७१ व्या वर्धापन दिनानिमित्त ठाणे जिल्हा कार्यकारिणी विस्तार सभा सोमवार दि. ४ मे २०२६ रोजी सायं. ३ ते ६ या वेळेत शांतिदूत बुद्ध विहार, शिवाजी नगर, मानपाडा येथे उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली.
कार्यक्रमाला महाराष्ट्र राज्य अध्यक्ष मा. बुधाजी वाढविंदे, महासचिव मा. हेमंत जाधव, राज्य मिडिया समन्वयक मा. मधुकर हरिचंद्र साळवे, राज्य सदस्य मा. मंगलाताई बिरारे, तसेच Amcs चे सदस्य मा. यशवंत बिरारे यांची प्रमुख उपस्थिती होती.
सभेची सुरुवात ठाणे जिल्हा महासचिव मा. भगवान गरुड यांनी केली. यावेळी भगवान गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेस मा. बुधाजी वाढविंदे यांनी पुष्प अर्पण केले, तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास मा. हेमंत जाधव यांनी हार अर्पण केला. मा. मधुकर साळवे यांनी दीपप्रज्वलन केले. उपस्थित मान्यवरांनी अगरबत्ती लावून वातावरण सुगंधित केले आणि सामुदायिक पंचशील वंदनेने कार्यक्रमाची सुरुवात झाली.
ठाणे जिल्हा अध्यक्षा मा. सुनिताताई धनेश्वर यांनी संस्थेचे कार्य, तसेच बँकिंग विषयावर मार्गदर्शन केले. त्यांनी राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. राजरत्न अशोकराव आंबेडकर यांच्या कार्याचा आढावा घेत राज्य कार्यकारिणीच्या उपक्रमांचे विश्लेषण केले. मा. मंगलाताई बिरारे यांनी संस्थेच्या उद्दिष्टांवर प्रकाश टाकत आगामी जनगणनेत बौद्ध धर्माची नोंद अचूक करण्याचे आवाहन केले.
मा. हेमंत जाधव यांनी मार्गदर्शन करताना ठाणे जिल्हा कार्यकारिणीचा विस्तार जाहीर केला. विविध पदाधिकाऱ्यांचा कार्यकारिणीत समावेश करून संघटन बळकट करण्यात आले. वर्धापन दिनानिमित्त संस्थेची स्थापना, तिची दहा उद्दिष्टे आणि त्यांच्या अंमलबजावणीचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले.
मा. बुधाजी वाढविंदे यांनी संस्थेचा ऐतिहासिक प्रवास उलगडत समाज विकासासाठी संघटित कार्याची गरज व्यक्त केली. तसेच २२ प्रतिज्ञांचे वाचन करून उपस्थितांना मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाच्या शेवटी ठाणे जिल्हा महासचिव मा. भगवान गरुड यांनी आभार प्रदर्शन केले. “बुद्धं शरणं गच्छामि”च्या घोषणांनी कार्यक्रमाची सांगता झाली.


Post a Comment
0 Comments