प्रतिनिधी : आनंद भालेराव
टिटवाळा : मध्य रेल्वेच्या मुंबई मंडळातील टीटवाळा रेल्वे स्थानकावर प्रवाशांना जीव मुठीत धरून रेल्वे रुळ ओलांडून प्रवास करावा लागत असल्याचे चित्र काही दिवसांपासून पाहायला मिळत होते. प्लॅटफॉर्म क्रमांक १ आणि २ वर येणाऱ्या कसारा व आसनगाव लोकलमधून उतरलेल्या प्रवाशांना टीटवाळा पूर्वेकडे जाण्यासाठी रेल्वे रुळ ओलांडण्याचा धोका पत्करावा लागत होता.
स्थानकावरील पादचारी पुलाचे (फूट ओव्हर ब्रिज) काम सुरू असल्याने तसेच उपलब्ध लिफ्टची संख्या मर्यादित असल्यामुळे मोठ्या प्रमाणावर गर्दी होत होती. त्यामुळे अनेक प्रवासी वेळ वाचविण्यासाठी रेल्वे रुळ ओलांडत होते, ज्यामुळे अपघाताचा धोका वाढला होता.
या गंभीर समस्येकडे सोशल मीडियाच्या माध्यमातून रेल्वे प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले. त्याची दखल घेत मध्य रेल्वे प्रशासनाने पादचारी पुलाच्या कामाला गती दिली आहे. पुलासाठी आवश्यक गार्डर बसविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असून लवकरात लवकर हा पूल प्रवाशांसाठी खुला करण्यात येणार असल्याचे आश्वासन प्रशासनाने दिले आहे.
पादचारी पूल सुरू झाल्यानंतर प्रवाशांना सुरक्षित आणि सुलभ प्रवास करता येणार असून रेल्वे रुळ ओलांडण्याची गरज भासणार नाही. त्यामुळे टीटवाळा स्थानकावरील हजारो प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.


Post a Comment
0 Comments