प्रतिनिधी : शंकर गायकवाड
📍 Kolhapur
रिपब्लिकन सेनेच्या वतीने उपवर्गीकरण संदर्भात आयोजित बैठकीत रिपब्लिकन सेनेचे युवा नेते Adv. Aman Anandraj Ambedkar यांनी उपस्थित राहून कार्यकर्त्यांना सविस्तर मार्गदर्शन केले.
या बैठकीदरम्यान उपवर्गीकरणाच्या मुद्द्यावर कार्यकर्त्यांसोबत व्यापक चर्चा करण्यात आली. समाजामध्ये जनजागृती कशी वाढवायची, संविधानिक हक्कांचे संरक्षण करण्यासाठी संघटितपणे कसे उभे राहायचे तसेच हा विषय प्रत्येक घरापर्यंत कसा पोहोचवायचा यावर सखोल संवाद साधण्यात आला.
इंदु मिल स्मारक प्रणेते सरसेनानी Anandraj Ambedkar व रिपब्लिकन सेना उपवर्गीकरणाच्या विरोधात ठाम भूमिका घेत असल्याचे यावेळी सांगण्यात आले. उपवर्गीकरणाच्या माध्यमातून संविधानिक हक्क, सामाजिक न्याय आणि भविष्यातील पिढ्यांच्या अस्तित्वाशी संबंधित गंभीर प्रश्न निर्माण होऊ शकतात, अशी चिंता व्यक्त करण्यात आली.
चर्चेदरम्यान उपवर्गीकरणामुळे अनुसूचित जाती समाजामध्ये फूट पडण्याची शक्यता, आरक्षणाच्या अधिकारांमध्ये असमतोल निर्माण होण्याचा धोका तसेच समाजामध्ये अंतर्गत संघर्ष वाढण्याची भीती यावरही कार्यकर्त्यांनी आपली मते मांडली.
यावेळी प्रत्येक कार्यकर्त्याने गावागावात आणि घराघरात जाऊन संविधानाने दिलेल्या हक्कांविषयी जनजागृती करण्याचे आवाहन करण्यात आले. हा संघर्ष संविधानिक, लोकशाही आणि शांततेच्या मार्गाने अधिक ताकदीने पुढे नेण्याचा निर्धार बैठकीत व्यक्त करण्यात आला.
“आपली एकजूट हीच आपली खरी ताकद असून, आता हा लढा अधिक व्यापक करण्याची वेळ आली आहे,” असे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.

Post a Comment
0 Comments