शहापूर |
मुंबई-नाशिक महामार्गावर शहापूरजवळ अज्ञात वाहनाने दुचाकीला दिलेल्या जोरदार धडकेत दोन जिवलग मित्रांचा जागीच मृत्यू झाल्याची अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे. या अपघातामुळे शहापूर तालुक्यात हळहळ व्यक्त होत असून परिसरात शोककळा पसरली आहे.
मृतांमध्ये दीप भेरे (वय १८, रा. चेरपोली, शहापूर) आणि हर्षल कांबळे (वय १९, रा. साखरोली) यांचा समावेश आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी सकाळी सुमारे ९ वाजण्याच्या दरम्यान हे दोघे काही कामानिमित्त दुचाकीवरून नाशिकच्या दिशेने जात होते. यावेळी मुंबई-नाशिक महामार्गावरील आटगाव येथील गुरुनानक ढाब्यासमोर पाठीमागून भरधाव वेगाने आलेल्या एका अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली.
धडक इतकी भीषण होती की दोघांचाही घटनास्थळीच मृत्यू झाला. अपघातानंतर परिसरात मोठी गर्दी जमली होती. स्थानिक नागरिकांनी तत्काळ मदतीसाठी धाव घेतली, मात्र दोघांचाही मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले.
या घटनेमुळे चेरपोली आणि साखरोली परिसरात शोककळा पसरली असून, महामार्गावरील वाढत्या अपघातांबाबत नागरिकांनी चिंता व्यक्त केली आहे. वारंवार होणाऱ्या अपघातांमुळे महामार्गावरील वाहतुकीच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
दरम्यान, या प्रकरणी शहापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अपघातानंतर फरार झालेल्या अज्ञात वाहनाचा आणि चालकाचा शोध पोलीस घेत आहेत.

Post a Comment
0 Comments