प्रतिनिधी-मनोहर गायकवाड
ठाणे शहरातील कापूरबावडी वाहतूक विभागाने धाडसी आणि तत्पर कारवाई करत बेळगाव येथून चोरी करून आणलेली KIA कंपनीची Seltos कार जप्त केली. या कारवाईदरम्यान आरोपी चालकाने पोलिसांच्या अंगावर कार घालण्याचा प्रयत्न केल्याने काही काळ परिसरात थरार निर्माण झाला.
रविवारी (१० मे २०२६) गोल्डन क्रॉस परिसरात ड्रंक अँड ड्राईव्ह नाकाबंदी सुरू असताना वाहतूक नियंत्रण कक्षाकडून संशयित वाहनाबाबत माहिती मिळाली. नवी मुंबई हद्दीतून चोरीस गेलेली KA 22 MC 8122 क्रमांकाची KIA Seltos ठाण्याच्या दिशेने येत असल्याचे समजताच कापूरबावडी वाहतूक विभाग सतर्क झाला.
पोलीस उपायुक्त (वाहतूक) पंकज शिरसाट यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार अश्रू हाके, PSI सागर सांगवे आणि त्यांच्या पथकाने माजिवडा जंक्शन येथे वाहन अडवण्याचा प्रयत्न केला. मात्र आरोपीने वाहन न थांबवता पोलिसांच्या अंगावर कार घालण्याचा प्रयत्न करत घोडबंदर रोडच्या दिशेने भरधाव पलायन केले.
यानंतर पोलिसांनी एका डिलिव्हरी बॉयची दुचाकी घेऊन आरोपीचा पाठलाग सुरू केला. मानपाडा, पातलीपाडा, वाघबीळ मार्गे विजय गार्डन मेट्रो स्टेशनपर्यंत जवळपास आठ किलोमीटर हा पाठलाग सुरू होता. आरोपीने बेदरकारपणे वाहन चालवत अनेक वाहनांना धडक देण्याचाही प्रयत्न केला.
अखेर विजय गार्डन सिग्नलजवळ पोलिसांनी कार अडवून जप्त केली. मात्र आरोपी वाहन सोडून पळून गेला. पोलीस अंमलदार अश्रू हाके यांनी आरोपीचा पायी पाठलागही केला. आरोपीचा शर्ट पोलिसांच्या हाती लागला, मात्र अंधार आणि आडोशाचा फायदा घेत तो पसार झाला.
दरम्यान, जप्त करण्यात आलेली कार कापूरबावडी वाहतूक विभागात आणण्यात आली. त्यानंतर कारचे मालक राहुल जाधव आणि बेळगाव पोलिसांनी ठाण्यात येऊन वाहनाची ओळख पटवली. पुढील कायदेशीर कारवाईनंतर वाहन त्यांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

Post a Comment
0 Comments