प्रतिनिधी : कल्याण
प्रभाग क्रमांक १२ च्या एका बाजूस मध्य रेल्वेची हद्द येत असल्याने त्या परिसरातील नागरिकांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे. रेल्वे हद्दीतील रस्ता तसेच रस्त्याच्या दोन्ही बाजूंना असलेली गटारे नादुरुस्त असून ती कचरा व मातीने पूर्णपणे भरली आहेत. त्यामुळे पावसाळ्यात नागरिकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागू शकतो.
याशिवाय, रस्त्याच्या कडेला अपुरी प्रकाश व्यवस्था असल्याने परिसरात अंधाराचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे अनुचित प्रकार घडण्याची शक्यता निर्माण होत असल्याने नागरिकांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे.
या सर्व समस्यांच्या अनुषंगाने माजी नगरसेवक नितीन निकम व प्रकाश तांबोळी यांनी संबंधित रेल्वे अधिकाऱ्यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली. यावेळी परिसरातील रस्त्यांची दुरुस्ती, गटारांची साफसफाई तसेच पुरेशी प्रकाश व्यवस्था उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली.
रेल्वे अधिकाऱ्यांनी या समस्या लवकरात लवकर सोडविण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्यात येईल, असे आश्वासन दिले.
सदर बैठकीस माजी नगरसेवक नितीन निकम, प्रकाश तांबोळी यांच्यासह प्रभागातील ज्येष्ठ नागरिक दिलीप पाटील, संजय ठाणगे, चेतन नायडू आणि सुनिल आहेर उपस्थित होते. सर्वांनी परिसरातील समस्यांवर चर्चा करून त्या तातडीने मार्गी लावण्याची मागणी केली.
प्रभाग क्रमांक १२ मधील नागरिकांच्या मूलभूत सुविधांसाठी करण्यात आलेल्या या पाठपुराव्याचे परिसरातून स्वागत करण्यात येत आहे.

Post a Comment
0 Comments