प्रतिनिधी -मनोहर गायकवाड
कल्याण : कल्याण रेल्वे स्थानकावर कोणार्क एक्स्प्रेसमधून होणाऱ्या गांजा तस्करीचा कल्याण रेल्वे पोलीस आणि रेल्वे सुरक्षा बल (RPF) यांच्या संयुक्त कारवाईत पर्दाफाश करण्यात आला. या कारवाईत सुमारे २० किलो गांजा जप्त करण्यात आला असून दोन परराज्यातील तरुणांना अटक करण्यात आली आहे.
अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे निकी कुमार शाह आणि कुलदीप मंडल अशी असून ते बिहारमधून गांजा घेऊन कल्याण येथे आले होते. कोणार्क एक्स्प्रेस प्लॅटफॉर्म क्रमांक ४ वर आल्यानंतर या दोघांच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने आरपीएफ जवानांनी रेल्वे पोलिसांच्या मदतीने त्यांच्या ताब्यातील गोण्यांची तपासणी केली.
तपासणीदरम्यान गोण्यांमध्ये लपवून ठेवलेला सुमारे २० किलो गांजा आढळून आला. पोलिसांनी तत्काळ दोघांना ताब्यात घेऊन अटक केली. जप्त करण्यात आलेल्या गांजाची किंमत आणि त्याचे अंतिम ठिकाण याबाबत तपास सुरू आहे.
दरम्यान, हा गांजा कल्याणमध्ये नेमका कोणासाठी आणला होता आणि तो कुठे पोहोचवला जाणार होता, याचा सखोल तपास कल्याण रेल्वे पोलीस करत आहेत.

Post a Comment
0 Comments