प्रतिनिधी : आनंद भालेराव
कल्याण : कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या अनधिकृत बांधकाम विरोधी पथकाने अ प्रभाग क्षेत्रातील टिटवाळा, बल्याणी, उंभारणी आणि धर्मशिला मैदान परिसरात मोठी कारवाई करत ५०० हून अधिक बेकायदा चाळी जमीनदोस्त केल्या आहेत. मागील दोन ते तीन दिवसांपासून ही धडक कारवाई सुरू असून परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
स्थानिक स्तरावर सुरू असलेल्या चर्चेनुसार, बेकायदा चाळी उभारण्यासाठी प्रत्येक चाळीमागे सुमारे २२ हजार रुपये घेतल्याचे आरोप करण्यात येत आहेत. तसेच संबंधित अधिकाऱ्यांनी या माध्यमातून दीड ते दोन कोटी रुपयांची कमाई केल्याची चर्चा नागरिकांमध्ये रंगली आहे. मात्र, या आरोपांची अधिकृत पुष्टी झालेली नाही.
महानगरपालिकेच्या या कठोर कारवाईनंतर संबंधित अधिकारी अडचणीत सापडल्याची चर्चा असून, स्थानिक पातळीवर भूमाफिया आणि काही अधिकारी यांच्यात कथित आर्थिक व्यवहार झाल्याचे दावेही केले जात आहेत. या पार्श्वभूमीवर अ प्रभाग कार्यालयाबाहेर तणावाचे वातावरण निर्माण झाल्याचे समजते.
दरम्यान, या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात यावी आणि दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून जोर धरत आहे.


Post a Comment
0 Comments