प्रतिनिधी : आनंदा भालेराव
ठाणे, दि. १ जून २०२६ : अनिकेत गायकवाड व त्यांच्या कुटुंबीयांवर झालेल्या प्राणघातक हल्ल्याच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडी, ठाणे शहरच्या वतीने आज वर्तकनगर पोलीस ठाण्यावर धडक मोर्चा काढण्यात आला. सकाळी ११ वाजता काढण्यात आलेल्या या मोर्चात मोठ्या संख्येने समाजबांधव सहभागी झाले होते.
या मोर्चामध्ये सदर प्रकरणातील आरोपींविरुद्ध तातडीने गुन्हा दाखल करून त्यांना लवकरात लवकर अटक करण्यात यावी, तसेच वर्तकनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अवैध धंद्यांवर तात्काळ कारवाई करण्यात यावी, अशा प्रमुख मागण्या करण्यात आल्या.
युवा नेते तथा ठाणे शहर महासचिव गौतम मस्के यांच्या नेतृत्वाखाली या मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. मोर्चाची सुरुवात डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून करण्यात आली असून भीमनगर मार्गे वर्तकनगर पोलीस ठाण्यावर मोर्चा धडकला.
यावेळी उपस्थितांनी "हक्क आमचे – लढा आमचा", "अन्याय करणाऱ्यांना संरक्षण नाही", "जो बहुजनांच्या हक्कांवर वार करेल त्याला लोकशक्तीच्या जोरावर उत्तर दिले जाईल", तसेच "जय भीम, जय संविधान" आणि "पीडितास न्याय मिळालाच पाहिजे" अशा जोरदार घोषणा दिल्या.
मोर्चात ठाणे शहरातील बहुसंख्य समाजबांधव सहभागी झाले होते. उपस्थितांना मार्गदर्शन करण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे ज्येष्ठ नेते आयु. सर्वजीत बनसोडे हे देखील उपस्थित होते. त्यांनी पीडित कुटुंबाला न्याय मिळावा आणि आरोपींवर कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी केली.

Post a Comment
0 Comments