प्रतिनिधी : आनंद भालेराव
कल्याण – महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) मर्यादित बसफेऱ्यांमुळे कल्याण-मुरबाड मार्गावरील प्रवाशांना मोठ्या गैरसोयींचा सामना करावा लागत असून खाजगी वाहतुकीचा पर्याय स्वीकारण्याची वेळ आली आहे. एप्रिल महिन्यात या मार्गावर झालेल्या भीषण अपघातानंतर वाहतूक व्यवस्थेतील अनेक त्रुटी पुन्हा एकदा समोर आल्या आहेत.
मुरबाड व परिसरातील नागरिकांनी मुरबाडहून अधिक एसटी बसफेऱ्या सुरू करण्याची मागणी केली आहे. तसेच कल्याण-डोंबिवली महानगरपालिका (केडीएमसी) आणि उल्हासनगर महानगरपालिका (यूएमटी) यांच्या परिवहन सेवा मुरबाडपर्यंत विस्ताराव्यात, अशीही जोरदार मागणी होत आहे.
प्रवाशांच्या हितासाठी या सेवा सुरू करण्याची तयारी असतानाही विविध तांत्रिक व प्रशासकीय अडचणींमुळे हा प्रस्ताव अद्याप रखडल्याची माहिती समोर येत आहे. परिणामी सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा बोजवारा उडाल्याने नागरिकांना जीव मुठीत धरून खाजगी वाहनांमधून प्रवास करावा लागत आहे.
या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी मुरबाडकडे जाणाऱ्या एसटी बसफेऱ्यांची संख्या वाढविणे तसेच शेजारील दोन्ही महापालिकांच्या परिवहन सेवा मुरबाडपर्यंत सुरू करणे आवश्यक असल्याचे मत नागरिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे. नागरिकांच्या वाढत्या मागणीमुळे संबंधित प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन तातडीने निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Post a Comment
0 Comments