Type Here to Get Search Results !

Objectives

Objectives

कास्ट्राईब कर्मचारी व शिक्षक संघटनांच्या मागण्यांवर जिल्हा परिषदेत सकारात्मक चर्चा सेवा विषयक प्रश्नांना प्राधान्याने न्याय देणार – मुख्य कार्यकारी अधिकारी रणजित यादव.

सहसंपादक -शंकर गायकवाड 

ठाणे जिल्हा परिषदेत कास्ट्राईब कर्मचारी महासंघ, कास्ट्राईब शिक्षक संघटना आणि महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघ यांच्या संयुक्त विद्यमाने अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित सेवा विषयक प्रश्नांवर महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. मुख्य कार्यकारी अधिकारी रणजित यादव यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत कर्मचारी हिताशी संबंधित अनेक मुद्द्यांवर सकारात्मक चर्चा करण्यात आली.


बैठकीला अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अजिंक्य पवार, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य प्रशासन) अविनाश फडतरे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी वैजनाथ बुरडकर, जिल्हा समाज कल्याण अधिकारी उज्ज्वला सपकाळे, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) बाळासाहेब राक्षे, जिल्हा कार्यक्रम अधिकारी शोभा शेलार, जिल्हा माता व बाल संगोपन अधिकारी डॉ. स्वाती पाटील, कृषी विकास अधिकारी एम. एम. बाचोटीकर यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.


बैठकीत जिल्हा परिषदेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांची सेवापुस्तके डिजिटल पद्धतीने अद्ययावत करण्याचा निर्णय, त्यामध्ये आवश्यक सेवा नोंदींचा समावेश आणि सेवा प्रक्रियेत अधिक पारदर्शकता आणण्याबाबत सविस्तर चर्चा झाली. तसेच राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM) अंतर्गत कार्यरत कर्मचाऱ्यांना १०-२०-३० लाभ मिळवून देण्यासाठी प्रशासनाने केलेल्या प्रयत्नांचे संघटनेच्या प्रतिनिधींनी कौतुक केले.


प्राथमिक शिक्षकांची रिक्त पदे तातडीने भरावीत, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, तसेच कर्मचारी प्रश्नांवर नियमित संवाद साधण्यासाठी दर तीन महिन्यांनी बैठक आयोजित करण्याची मागणी संघटनांनी केली.

गट विमा, भविष्य निर्वाह निधी, सेवा विषयक प्रकरणे आणि कर्मचारी कल्याणाशी संबंधित विविध बाबींमध्ये प्रशासनाने केलेल्या कार्यवाहीबद्दल संघटनांनी समाधान व्यक्त केले.


मुख्य कार्यकारी अधिकारी रणजित यादव यांनी प्रशासन कर्मचारी हितासाठी कटिबद्ध असल्याचे सांगत, सेवा विषयक प्रकरणे वेळेत निकाली काढण्यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू असल्याचे स्पष्ट केले. विशेषतः सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची निवृत्तीवेतन आणि इतर प्रकरणे प्राधान्याने निकाली काढण्याचे आश्वासन त्यांनी दिले. कर्मचारी व प्रशासन यांच्यातील संवाद आणि समन्वय अधिक प्रभावी करण्यावर भर देण्यात येणार असल्याचेही त्यांनी नमूद केले.


बैठकीस महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघाचे कोकण विभाग अध्यक्ष संतोष साबळे, केंद्रीय उपाध्यक्ष अनिल धांडे, सहसचिव जनार्धन राऊत, जिल्हाध्यक्ष दिपक साळवे, राज्य उपाध्यक्ष तथा जिल्हाध्यक्ष विजय जाधव, कोकण विभाग अध्यक्ष संतोष गाढे, प्रदेश सचिव शिवाजी बिबराळे, कार्याध्यक्ष राहुल नगराळे, जिल्हाध्यक्ष किशोर भोईर यांच्यासह विविध संघटनांचे पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.


बैठकीच्या शेवटी कर्मचारी हिताच्या प्रश्नांवर प्रशासन आणि कर्मचारी संघटनांनी समन्वयाने काम करण्याचा निर्धार व्यक्त केला.

Post a Comment

0 Comments