प्रतिनिधी - आनंदा भालेराव
श्रीरामपूर, अहिल्यानगर : श्रीरामपूर शहरातील प्रसिद्ध हॉटेल व्यावसायिक आकाश चंद्रशेखर दुबैया यांची हॉटेलमध्ये झालेल्या वादातून निर्घृण हत्या झाल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेने शहरात मोठी खळबळ उडाली असून व्यापारी व नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, श्रीरामपूर येथील लक्ष्मीनारायण ॲण्ड लॉजिंग येथे काही आरोपी नशेत आले होते. जेवण मिळण्यास उशीर झाल्याच्या कारणावरून त्यांनी हॉटेलमधील वेटरला शिवीगाळ करत मारहाण केल्याचा आरोप आहे. वाद वाढत असल्याचे पाहून हॉटेल मालक आकाश दुबैया यांनी मध्यस्थी करून भांडण मिटविण्याचा प्रयत्न केला. मात्र, चिडलेल्या आरोपींनी आकाश दुबैया यांच्यावर खुर्ची तसेच धारदार शस्त्राने हल्ला केल्याचे सांगण्यात येते. या हल्ल्यात आकाश दुबैया यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
घटनेनंतर श्रीरामपूर पोलिसांनी तातडीने तपासाची सूत्रे हलवत मुख्य आरोपी सूरज जाधव, यश जाधव आणि ओम डफल या तिघांना अटक केली आहे.
या घटनेनंतर शहरातील व्यापारी आणि नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त करण्यात आला. आरोपींवर मोक्का (MCOCA) अंतर्गत कारवाई करण्याच्या मागणीसाठी श्रीरामपूरमधील व्यापाऱ्यांनी चार दिवस कडकडीत बंद पाळल्याची माहिती आहे.
दरम्यान, अहिल्यानगर दौऱ्यावर असलेले वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजातदादा आंबेडकर यांनी मयत आकाश दुबैया यांच्या घरी भेट देऊन शोकाकुल कुटुंबीयांचे सांत्वन केले. यावेळी वंचित बहुजन आघाडीच्या राज्य प्रवक्त्या उत्कर्षाताई रुपवते, सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे राज्य प्रवक्ते प्रशांत बोराडे, तसेच तालुक्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी दुबैया कुटुंबीयांना न्याय मिळवून देण्यासाठी पक्षाच्या वतीने आवश्यक पाठपुरावा करण्याचे आश्वासन देण्यात आले. घटनेतील आरोपींवर कठोर कारवाई करून पीडित कुटुंबाला न्याय मिळावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

Post a Comment
0 Comments