मुरबाड | प्रतिनिधी- आनंदा भालेराव
दिवाळी हा आनंद, उत्साह आणि प्रकाशाचा सण. मात्र समाजातील वंचित आणि गरजू घटकांच्या जीवनातही आनंदाचा प्रकाश निर्माण व्हावा, या सामाजिक भावनेतून मुरबाड तालुक्यातील रासगाव आदिवासी पाड्यात दिवाळीचा सण उत्साहात साजरा करण्यात आला.
ऑल इंडिया रेल्वे पेन्शनर वेल्फेअर फेडरेशन, मुंबई मंडळाचे अध्यक्ष कॉ. जे. एन. पाटील यांच्या नेतृत्वाखाली नाना इंटरप्रायझेसच्या वतीने आदिवासी बांधवांना दिवाळी फराळ, धान्य, ताट-वाट्या तसेच आदिवासी महिलांना साड्यांचे वाटप करण्यात आले. या सामाजिक उपक्रमात त्यांच्या पत्नीनेही मोलाचे योगदान दिले.
कॉ. जे. एन. पाटील हे नेहमीच कामगार, कष्टकरी, दलित आणि आदिवासी समाजाच्या मदतीसाठी पुढाकार घेत असतात. वंचित घटकांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्यांचे सातत्याने प्रयत्न सुरू असतात. कोणत्याही जाती-पातीचे राजकारण न करता केवळ माणुसकी आणि सामाजिक बांधिलकी जपण्याचा त्यांचा दृष्टिकोन या उपक्रमातून पुन्हा एकदा दिसून आला.
आदिवासी पाड्यातील कुटुंबांसोबत दिवाळी साजरी करताना त्यांच्या चेहऱ्यावर उमटलेला आनंद आणि समाधान पाहून वेगळाच आनंद मिळतो, अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली. समाजातील गरजू घटकांसोबत सण साजरा करणे, हाच खऱ्या अर्थाने दिवाळीचा प्रकाश असल्याचे या उपक्रमाने अधोरेखित केले.
'तुम जिओ हजारों साल, साल के दिन हो पचास हजार!' अशा शुभेच्छांसह कॉ. जे. एन. पाटील यांच्या सामाजिक कार्याचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.


Post a Comment
0 Comments