प्रतिनिधी -तेजस घोसाळे,
संगमनेर - शेतकरी, शेतमजूर, कष्टकरी, भटके-विमुक्त समाज आणि सर्वसामान्य नागरिकांच्या प्रलंबित प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने रविवार, दिनांक ८ नोव्हेंबर रोजी शिर्डी येथील अपर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करण्यात आले. शासनाच्या धोरणांविरोधात नाराजी व्यक्त करत आंदोलकांनी यावेळी काळी दिवाळी साजरी करून आपल्या मागण्यांसाठी आवाज बुलंद केला.
राष्ट्रीय अध्यक्ष श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या आंदोलनात जिल्ह्यातील विविध तालुक्यांमधील पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांना योग्य बाजारभाव मिळत नसणे, अवकाळी पाऊस आणि दुष्काळामुळे होणारे नुकसान, वाढती महागाई, बेरोजगारी तसेच ग्रामीण भागातील रोजगाराच्या मर्यादित संधी या प्रश्नांमुळे सामान्य जनतेचे जीवन अधिक कठीण झाले आहे. या परिस्थितीवर शासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी आंदोलकांनी केली.
आंदोलनादरम्यान अपर जिल्हाधिकारी यांच्याकडे विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. यामध्ये शेतकऱ्यांचे संपूर्ण कर्ज माफ करणे, पीकविम्याची नुकसानभरपाई त्वरित वितरित करणे, शेतमालाला हमीभाव देणे आणि सरकारी खरेदी केंद्रे सुरू करणे या प्रमुख मागण्यांचा समावेश होता. तसेच शेतकऱ्यांचे वीजबिल माफ करावे आणि जनावरांसाठी चारा व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी, अशीही मागणी करण्यात आली.
ग्रामीण भागातील रोजगाराचा प्रश्न सोडविण्यासाठी मनरेगा योजनेंतर्गत वर्षाला २०० दिवस काम आणि किमान ५०० रुपये रोजंदारी देण्याची मागणी करण्यात आली. याशिवाय अनाथ व निराधार नागरिकांना रेशन सुविधा, बेघर कुटुंबांना घरे, विद्यार्थ्यांना शैक्षणिक आर्थिक मदत आणि कष्टकरी कुटुंबांना आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यावरही भर देण्यात आला.
शासनाने या मागण्यांकडे गांभीर्याने लक्ष देऊन संबंधित विभागांना तातडीने कार्यवाहीचे आदेश द्यावेत आणि केलेल्या कार्यवाहीचा लेखी अहवाल द्यावा, अशी भूमिका आंदोलनकर्त्यांनी मांडली. अन्यथा लोकशाही व संवैधानिक मार्गाने यापेक्षाही तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही निवेदनातून देण्यात आला.
या आंदोलनात जिल्हा उपाध्यक्ष बबन पगारे, योगेश गायकवाड यांच्यासह श्रीरामपूर, संगमनेर, राहुरी, कोपरगाव, नेवासा आणि शिर्डी परिसरातील विविध पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी जिल्हाध्यक्ष, तालुकाध्यक्ष, संघटक, सचिव आणि इतर पदाधिकाऱ्यांनी आंदोलनात सक्रिय सहभाग घेतला. वंचित, शोषित, शेतकरी आणि कष्टकरी जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी संघटना यापुढेही संघर्ष सुरू ठेवणार असल्याचा निर्धार उपस्थितांनी व्यक्त केला.
जनतेच्या मूलभूत प्रश्नांवर ठोस निर्णय घेऊन शासनाने तातडीने कार्यवाही करावी, हीच या आंदोलनामागील प्रमुख भूमिका असल्याचे वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

Post a Comment
0 Comments