![]() |
| डॉ. भीमराव आंबेडकर यांची प्रमुख उपस्थिती; उपासक-उपासिकांना धम्मविचारांचे मोलाचे मार्गदर्शन. |
प्रतिनिधी - आनंदा भालेराव
शहापूर : भारतीय बौद्ध महासभा तालुका शहापूर व शहर कार्यकारिणीच्या वतीने ७ नोव्हेंबर २०२६ रोजी कुमार गार्डन हॉल, शहापूर येथे श्रामणेर, बौद्धाचार्य, युवक व बाल श्रामणेर धम्म मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. हा मेळावा तालुकाध्यक्ष आदरणीय मारुती राघो चन्ने यांच्या अध्यक्षतेखाली, तर स्वागताध्यक्षा आदरणीय मृणालताई महेंद्र भोईर यांच्या उपस्थितीत अत्यंत शिस्तबद्ध व उत्साही वातावरणात संपन्न झाला.
या मंगलमय कार्यक्रमाला महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू तथा भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष डॉ. भीमराव आंबेडकर यांची प्रमुख उपस्थिती लाभली. त्यांनी उपस्थित उपासक व उपासिकांना मोलाचे मार्गदर्शन केले. तथागत गौतम बुद्धांनी दिलेला शांती, करुणा आणि समतेचा विचार समाजाच्या प्रत्येक घटकापर्यंत पोहोचविण्यासाठी अशा धम्म मेळाव्यांचे आयोजन अत्यंत महत्त्वपूर्ण असल्याचे त्यांनी प्रतिपादन केले.
या मेळाव्याला शहापूर व मुरबाड तालुक्यांसह परिसरातील विविध गावांमधील राजकीय, धार्मिक, सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर तसेच मोठ्या संख्येने समाजबांधव, उपासक व उपासिका उपस्थित होते.
धम्मविचारांचा प्रसार, बौद्ध संस्कारांची जोपासना आणि युवकांसह बालकांमध्ये धम्माची प्रेरणा निर्माण करण्याच्या दृष्टीने हा मेळावा महत्त्वपूर्ण ठरला. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सहकार्य करणाऱ्या सर्व मान्यवरांचे, उपस्थितांचे व समाजबांधवांचे भारतीय बौद्ध महासभा तालुका शहापूर व शहर कार्यकारिणीच्या वतीने आभार व्यक्त करण्यात आले.

Post a Comment
0 Comments